शांत व तजेला देणाऱ्या झोपेसाठी
शरीराला झोपेची गरज काय असते?
झोपेमुळे आपल्याला विश्रांती मिळते हे खरे आहे, पण झोप ही फक्त आपल्या विश्रांती साठी, किंवा आराम किंवा चैनी ची गोष्ट नाही. आपले शरीर व मेंदू आपण झोपेत असताना, खालील गोष्टी करत असते:
-
शरीरात दिवसभर वापरले गेलेली सर्व संसाधने पुनः नीट मूळच्या स्थितीत आणते.
-
पुढच्या दिवशी आपण तितक्याच ताकदीने सर्व कामे व व्यवहार करू शकू यासाठी शरीराची डागडुजी करते.
-
शरीरातील संप्रेरके (enzymes व hormones) यांचा समतोल साधते.
-
दिवसभर केलेली मानसिक कामे, स्मृति यांच्यावर प्रक्रिया करून स्मरणशक्ती मध्ये योग्य त्या गोष्टी साठवते.
-
ह्रदय, श्वसन याचा कामाची गती कमी करते, जेणेकरून त्यांना थोडी विश्रांती मिळते.
एका दिवसभरात साधारण किती झोपेची गरज असते?
झोप व तिची गरज ही व्यक्ती प्रमाणे बदलत असते. त्यामुळे एक नियम किंवा मोजपट्टी लावून सरसकट सल्ला देता येत नाही. पण जर सरासरी विचार केला, तर प्रत्येक माणसाने दिवसभरात 7 ते 8 तास झोप घेणे हे योग्य ठरते. कोणत्याही नियमाप्रमाणे या नियमालाही अपवाद आहेतच. अनेक लोक दिवसात 6 तास, किंवा अगदी 4 तास झोप घेऊन देखील निरोगी, आनंदी आयुष्य जगतात. त्यामुळे झोपेची गरज ठरवताना आपला स्वभाव, आपली जीवनशैली, आपले काम व आरोग्य या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.
झोप चांगली होत आहे हे कसे ठरवावे?
जसे, किती तास अभ्यास केला हे जितके महत्वाचे आहे, तितकेच अभ्यास किती लक्ष देऊन केला याला देखील तितकेच महत्व आहे. त्याच प्रमाणे, झोप केवळ किती तास लागली हे महत्वाचे नसून, कशी झाली हे देखील महत्वाचे आहे. चांगली झोप ही:
-
ठरलेल्या वेळेस झोप यायला सुरुवात होते. झोपेसाठी खूप वेळ वाट पहावी लागत नाही.
-
सलग असते, मध्ये मध्ये अकारण तुटत नाही.
-
झोप लागताना किंवा झोपेत अचानक दचकणे, दचकून ऊठणे अशा गोष्टी होत नाहीत.
-
गाढ आणि शांत असते. छोट्या छोट्या आवाजाने किंवा हालचाल झाल्यामुळे मोडत नाही.
-
झोपेत वाईट स्वप्ने पडून जाग येणे, किंवा पडलेली स्वप्ने दुसऱ्या दिवशी आठवत राहणे असे प्रकार होत नाहीत.
-
सकाळी उठल्यावर झोप झाल्याचे समाधान मिळते. दिवस तजेलदार जातो.
-
दुसऱ्या दिवशी सतत जांभया येणे, डुलकी येणे असे होत नाही.
-
झोपेत बिछान्यात लघवी होणे, बडबड करणे, अचानक दचकून उठणे, दातावर दात वाजणे अशा गोष्टी होत नाहीत.
चांगली झोप कशासाठी गरजेची आहे?
झोप चांगली झाली, तर मिळणारे फायदे आपण वर बघितले. जर झोप नीट झाली नाही, तर:
-
दिवसभराच्या कार्यक्षमते वर परिणाम होतो.
-
डोकेदुखी, दिवसभरात येणारी झोप अशा त्रासाला तोंड द्यावे लागते.
-
शरीरीक व मानसिक ताण सहन करण्याची क्षमता कमी होते.
-
मानसिक ताण वाढून, मनोकायिक आजार (psychosomatic illness) जसे, रक्तदाब, मधुमेह, पोटाचे विकार, व्यसन, यांचे प्रमाण वाढते.